खासदार प्रणिती शिंदेंच्या मार्गदर्शनाखाली गॅस दरवाढीविरोधात पंढरपूर काँग्रेस आक्रमक; दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
पंढरपूर : प्रतिनिधी
केंद्र सरकारने घरगुती व व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात अचानक वाढ केल्याच्या निषेधार्थ पंढरपूर शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. ही दरवाढ तत्काळ मागे घ्यावी तसेच गॅसचा सुरळीत पुरवठा करावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.
केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरमध्ये ६० रुपयांची तर व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये ११५ रुपयांची दरवाढ केली असून त्यामुळे आधीच महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्य जनतेवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याचे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅसचा तुटवडा असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांना रांगा लावाव्या लागत आहेत. गॅस बुकिंगचा कालावधी वाढविण्यात आल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचीही नाराजी व्यक्त करण्यात आली.
गॅसच्या तुटवड्या

मुळे सर्वसामान्य नागरिकांसह हॉटेल व्यवसायिकांनाही गॅस उपलब्ध होत नसल्याने अनेक हॉटेल व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती गंभीर असून सरकारने ही अन्यायकारक दरवाढ तात्काळ मागे घ्यावी व घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा नियमित करून ग्राहकांना सहज उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.
हे निवेदन खासदार प्रणिताताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले असून सरकारने या निवेदनाची दखल न घेतल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप पाटील, शहराध्यक्ष आदित्य फत्तेपूरकर, शेकापचे नेते डॉ. अनिकेत देशमुख, काँग्रेस तालुका उपाध्यक्ष सादिक मुलाणी, युवक काँग्रेस अध्यक्ष संदीप शिंदे, विकास नागटिळक, विलास रोंगे, संतोष गोंजारी तसेच शहर व तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
—
