श्रेयवादावरून काल डिवचले, आज पुन्हा खुलासा; परिचारक-मालक यांच्या पाठपुराव्याचा घटनाक्रम मांडत शिरसटांनी घेतला भालकेंचा समाचार
पंढरपूर : यमाई तलावाला पाणी सोडण्यावरून सुरू झालेला श्रेयवादाचा वाद आता चांगलाच रंगला आहे. काल माजी नगरसेवक विक्रम शिरसट यांनी नगराध्यक्ष प्रणिता भालके यांच्या दाव्यावर सवाल उपस्थित करत त्यांना डिवचले होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा शिरसट यांनी यमाई तलावासाठी पाणी सोडण्यामागील संपूर्ण घटनाक्रमाचा खुलासा करत प्रशांत परिचारक व मालक परिचारक यांनी केलेल्या पाठपुराव्याची माहिती जनतेसमोर मांडली.
शिरसट यांनी सांगितले की, पुणे जिल्ह्यात झालेल्या मोठ्या पावसामुळे उजनी धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला. त्यानंतर उजनीतून कॅनॉल व भीमा नदीला पाणी सोडण्यात आले. याच काळात यमाई तलावात पाणी सोडण्याचा प्रश्न निर्माण झाला.
याबाबत सुरुवातीला जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला. मात्र, “या विषयावर मंत्री महोदयांशी बोलणे योग्य राहील,” असे अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर २४ जुलै रोजी प्रशांत परिचारक यांनी थेट जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी संपर्क साधला.
कॅनॉलमधून वाहणारे पाणी यमाई तलावात सोडल्यास पालिकेला पाणीपट्टी भरावी लागणार नाही, ही बाब मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यानंतर मंत्र्यांकडून तातडीने आदेश देण्यात आले आणि अवघ्या तीन दिवसांत, २७ जुलै रोजी यमाई तलावासाठी पाणी सोडण्यात आले, असा दावा शिरसट यांनी केला.
पाणी सोडल्यानंतरही परिचारकांचा प्रत्यक्ष पाहणीवर भर
पाणी सोडल्यानंतर केवळ आदेश देऊन न थांबता प्रशांत परिचारक यांनी लक्ष्मीटाकळी येथील कॅनॉलपासून थेट यमाई तलावापर्यंतच्या पाण्याच्या प्रवाहाची प्रत्यक्ष पाहणी केली.
ओढ्यात कचरा व गाळ साचल्याने पाण्याचा प्रवाह अडत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तातडीने साफसफाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच लक्ष्मीटाकळी येथील पुलामुळे पाण्याला अडथळा निर्माण होत असल्याचे लक्षात येताच PWD अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून पुलाची उंची वाढविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
दरम्यान, ओढ्यातून वाहणारे पाणी शेतांमध्ये शिरत असल्याने काही शेतकऱ्यांनी दरवाजा बंद केला होता. ही बाब समजल्यानंतर टाकळी येथील सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या माध्यमातून संबंधित शेतकऱ्यांशी चर्चा करण्यात आली. त्यानंतर साखळी व कुलूप लावून पाण्याचा प्रवाह सुरळीत ठेवण्यात आला, अशी माहिती शिरसट यांनी दिली.
“१५ दिवसांनी श्रेय घेण्याचा प्रयत्न का?”
यमाई तलावातील पाणी दूषित झाले होते. ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने मोठ्या प्रमाणावर मासे मृत्युमुखी पडले होते. त्यामुळे तलावात तातडीने नवीन पाणी सोडणे गरजेचे होते.
मात्र, २७ जुलै रोजी पाणी सोडल्यानंतर तब्बल १० ते १२ दिवस या कामाचा कोणताही गाजावाजा करण्यात आला नाही. तलावात पाणी साचू लागल्यानंतर नगराध्यक्ष प्रणिता भालके यांनी आपल्या प्रयत्नांमुळे पाणी सोडण्यात आल्याचा दावा केल्याने आता श्रेयवादाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
शिरसट यांनी नगराध्यक्षांना सवाल करताना, “पाणी सोडण्यासाठी नेमका कोणत्या अधिकाऱ्याला फोन केला? कोणत्या मंत्र्यांशी संपर्क साधला? २४ जुलैपासून २७ जुलैपर्यंत नेमका कोणता पाठपुरावा केला? ओढ्यातील कचरा काढण्यासाठी कोणती यंत्रणा लावली? पुलाच्या अडथळ्याबाबत काय कार्यवाही केली?” असे प्रश्न उपस्थित केले.
श्रेय घेण्याला आमचा विरोध नाही; मात्र जे काम केले नाही, त्याचे श्रेय घेऊन जनतेची दिशाभूल करू नका, असा थेट इशाराही शिरसट यांनी दिला.
यमाई तलावाचा प्रश्न सुटण्यामागे प्रशांत परिचारक व मालक परिचारक यांनी केलेला पाठपुरावा, अधिकाऱ्यांशी केलेला समन्वय आणि प्रत्यक्ष ठिकाणी केलेले नियोजन याचा घटनाक्रम शिरसट यांनी आज जनतेसमोर मांडला.
आता या श्रेयवादाच्या आरोपांवर नगराध्यक्ष प्रणिता भालके काय उत्तर देतात, याकडे पंढरपूरकरांचे लक्ष लागले आहे.
