फोटोसेशनच्या आरोपांनंतर ‘शिरसट पॅटर्न’ची माणुसकी!
पूरग्रस्तांना भोजनासाठी ताटकळत ठेवले जात असल्याच्या चर्चेनंतर विक्रम शिरसट मैदानात; स्वखर्चातून नाश्ता अन् दोन वेळच्या जेवणाची जबाबदारी
**पंढरपूर :** भीमा नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढल्याने पूरस्थितीची शक्यता निर्माण झाल्यानंतर व्यास नारायण झोपडपट्टी परिसरातील नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले. मात्र, स्थलांतरित नागरिकांच्या भोजन व्यवस्थेवरून आता राजकीय वातावरण तापले असून, **‘फोटोसेशन झाले; पण पूरग्रस्तांच्या ताटात अन्न कधी येणार?’** अशी चर्चा शहरात रंगू लागली आहे.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने पूरग्रस्त नागरिकांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, **भोजनासाठी नागरिकांना ताटकळत ठेवले जात असल्याच्या चर्चा आणि प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनंतर** या संपूर्ण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

या पार्श्वभूमीवर भाजपचे माजी शहराध्यक्ष **विक्रम शिरसट** यांनी पुढाकार घेत, **‘पूरग्रस्तांच्या मदतीत राजकारण नको, माणुसकी हवी’** असा स्पष्ट संदेश दिला आहे. नगराध्यक्षांकडून पूरग्रस्त नागरिकांना तुच्छ वागणूक मिळत असल्याचा आरोप करत त्यांनी या प्रकाराचा निषेध केला असून, **व्यास नारायण झोपडपट्टी परिसरातील पूरग्रस्त नागरिकांसाठी स्वखर्चाने सकाळचा नाश्ता आणि दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करण्याची घोषणा केली आहे.**
**गेल्या ३५ ते ४० वर्षांपासून प्रभागातील जनतेच्या हाकेला धावून जाणारे माजी नगराध्यक्ष लक्ष्मणभाऊ शिरसट यांच्या समाजसेवेचा वारसा आणि सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन आपण जनसेवेत कार्यरत असल्याचे विक्रम शिरसट यांनी यावेळी सांगितले.**
पूरस्थितीच्या काळात नागरिकांना आधार देणे ही प्रत्येक लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्याची जबाबदारी आहे. **‘संकटात फोटो नव्हे, तर मदतीचा हात दिसला पाहिजे,’** या भूमिकेतून विक्रम शिरसट यांनी घेतलेल्या या निर्णयाची चर्चा आता शहरात सुरू झाली आहे.
### **‘पूरग्रस्तांच्या ताटात अन्न पोहोचेपर्यंत मदत थांबणार नाही!’ — विक्रम शिरसट यांच्या भूमिकेने प्रशासनासह सत्ताधाऱ्यांसमोर नवा सवाल**
