लक्ष्मी टाकळीत सापळा रचून कारवाई; 4.87 लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांवर गुन्हा
पंढरपूर | प्रतिनिधी :
पंढरपूर तालुक्यात अवैध गुटखा वाहतुकीवर तालुका पोलीसांनी मोठी कारवाई करत गुटखा माफियांना जोरदार दणका दिला आहे. लक्ष्मी टाकळी (ता. पंढरपूर) परिसरातील हॉटेल शाही दरबारजवळ सापळा रचून पोलिसांनी कारवाई करत 87 हजार 900 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि 4 लाख रुपयांची कार असा एकूण 4 लाख 87 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या अवैध धंद्यांवरील विशेष मोहिमेअंतर्गत सहाय्यक पोलीस निरीक्षक शहाजी गोसावी यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार लक्ष्मी टाकळी येथील हॉटेल शाही दरबार परिसरात सापळा रचण्यात आला. त्यावेळी मारुती सुझुकी (एमएच-45 एयू-6645) या चारचाकी वाहनाची तपासणी केली असता, गाडीच्या डिकीत व मधल्या सीटवर महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला पानमसाला (गुटखा) मोठ्या प्रमाणात आढळून आला.
या कारवाईत चालक श्रीकांत राजेंद्र बळवंतराव (वय 32, रा. सांगोला) याला ताब्यात घेण्यात आले. तर कारमधून उतरून संतोष चांगदेव सुरवसे (रा. खारवाटवाडी, ता. सांगोला) हा पसार झाला. तसेच हा गुटखा पुरविल्याचा आरोप असलेल्या संतोष डोंगरे (रा. इचलकरंजी, जि. कोल्हापूर) याच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र गोसावी करत आहेत.
ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे व सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बाबासाहेब पाटील, संतोष गायकवाड, विजयकुमार आवटे, मंगेश सुर्वे, सागर गवळी आणि सुरज देशमुख यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.
अवैध गुटखा विक्री व वाहतुकीविरोधात पोलिसांनी सुरू केलेल्या या धडक मोहिमेमुळे गुटखा तस्करांचे धाबे दणाणले असून, अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत पोलिसांकडून देण्यात आले आहेत.
