वाढदिवसाचा केक बाजूला ठेवत विकासकामांचा श्रीगणेशा!
दिलीप धोत्रेंचा वाढदिवस ठरला विकास आणि सामाजिक बांधिलकीचा उत्सव; प्रभाग १७ मधील चार कामांचे भूमिपूजन, वृद्धाश्रमात भोजनदान
पंढरपूर : प्रतिनिधी
वाढदिवस म्हटला की सत्कार, शुभेच्छा आणि जल्लोष… मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप धोत्रे यांनी यंदा वाढदिवसाला एक वेगळाच अर्थ दिला. वैयक्तिक सत्कार आणि उत्सवापेक्षा विकासकामांचा शुभारंभ आणि सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देत त्यांचा वाढदिवस पंढरीत समाजाभिमुख पद्धतीने साजरा करण्यात आला.
दिलीप धोत्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रभाग क्रमांक १७ मध्ये तब्बल चार महत्त्वपूर्ण विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. अरविंद कांबळे घर ते महात्मा फुले चौक रस्ता, शाळा क्रमांक ७ समोरील व्यायामशाळा, रमाईनगर येथील भुयारी गटर तसेच पाण्याच्या टाकीजवळील लक्ष्मी मंदिर परिसरातील कामांचा यात समावेश आहे.
शिवसेना नेते अनिल सावंत, नगराध्यक्ष प्रणिता भालके आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे गटनेते नागेश भोसले यांच्या हस्ते या विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक नागेश यादव, किरणराज घाडगे, आदित्य फत्तेपुरकर, नगरसेवक लोकेश यादव, नगरसेवक प्रसाद कळसे, नगरसेवक ओंकार जोशी यांच्यासह तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नगरसेवक, मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, ‘वाढदिवस माझा, पण आनंद समाजाचा’ या भावनेतून धोत्रे समर्थकांनी गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रमात वयोवृद्ध नागरिकांना भोजनदान केले. शहरातील विविध भागांतही सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
दुसरीकडे, दिवसभर पंढरपूर येथील दिलीप धोत्रे यांच्या संपर्क कार्यालयात शुभेच्छांचा अक्षरशः वर्षाव झाला. विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, व्यापारी, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांनी भेट देत त्यांना शुभेच्छा दिल्या.
वाढदिवसाच्या निमित्ताने सुरू झालेली विकासकामे, वृद्धाश्रमातील भोजनदान आणि नागरिकांशी असलेला सातत्यपूर्ण संवाद यामुळे दिलीप धोत्रे यांचा यंदाचा वाढदिवस ‘सेवेचा संकल्प आणि विकासाचा शुभारंभ’ ठरल्याची चर्चा पंढरीच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
