पंढरपूर; प्रतिनिधी
पंढरपूर बसस्थानक परिसरात अस्वच्छता; मोकाट जनावरांमुळे प्रवाशांचा संताप
पंढरपूर येथील बसस्थानक परिसरात अस्वच्छतेची समस्या गंभीर स्वरूप धारण करत असून प्रवासी व भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. बसस्थानकाच्या प्लॅटफॉर्मसमोरील मोकळ्या जागेत काही व्यक्ती उघड्यावर लघुशंका करत असल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. परिणामी, प्रवाशांना तेथे उभे राहणेही कठीण झाले आहे.
दररोज हजारो भाविक व प्रवासी पंढरपूर बसस्थानकात दाखल होत असतात. मात्र, अस्वच्छतेमुळे शहराची नकारात्मक प्रतिमा निर्माण होत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. विशेषतः महिला भाविकांना या परिस्थितीमुळे लज्जास्पद प्रसंगांना सामोरे जावे लागत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे.
याशिवाय बसस्थानक परिसरात मोकाट जनावरांचा वाढता वावर ही आणखी एक गंभीर समस्या ठरत आहे. जनावरांमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून अपघाताचा धोका वाढला आहे. नागरिकांनी प्रशासनाने तात्काळ कारवाई करून जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी केली आहे.

दरम्यान, माजी नगरसेवक विक्रम शिरसाट यांनी संबंधित प्रशासनाला निवेदन देत स्वच्छतेबाबत तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अन्यथा तीव्र भूमिका घेण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
पंढरपूर हे विठुरायाचे तीर्थक्षेत्र असल्याने दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. शहराची स्वच्छता आणि सुव्यवस्था राखणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे मत व्यक्त होत आहे. “स्वच्छ पंढरपूर, सुंदर पंढरपूर” ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली आहे.
